छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आयकर कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध आयकर विभागाच्या टीडीएस शाखेने धडक मोहीम सुरू केली. मंगळवारी (दि. २७) येथे दोन वेगवेगळ्या कंपन्यांवर सर्वेक्षण कारवाई करत विभागाने एकूण २ कोटी २३ लाख रुपयांची वसुली केली आहे.
रस्ते बांधकामात गुंतलेल्या एका मोठ्या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी कर्मचार्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या रकमेतून टीडीएस कापून तो केंद्र सरकारच्या खात्यात वेळेवर जमा करण्यात वारंवार कसूर करत होती. तसेच त्यांच्या ’टॅन’वर मोठी थकबाकी प्रलंबित होती. दिवसभर चाललेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर, आयकर विभागाने या कंपनीकडून १.७३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली. दुसर्या प्रकरणात, ताडपत्री, पॉलिमर आणि पेपर क्राफ्ट निर्मिती करणार्या कंपनीने टीडीएस कापूनही सुमारे ५० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले नसल्याचे समोर आले. सर्वेक्षणादरम्यान ही बाब उघड होताच विभागाने ही रक्कम वसूल केली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील आयकर कार्यालयांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.













